Saturday, August 9, 2014

चौकट आणि तपास

तब्बल आठ डोळे त्या चौकटीमधून बाहेर बघत होते. आता ते एकाच माणसाचे नव्हते हे मी वेगळं सांगायला नकोय, पण तरीही या आठ डोळ्यांची वाटणी स्पष्ट करतो, म्हणजे या कथेच्या नको त्या भागामध्ये तुम्ही डोके खर्च करणार नाही.
तर या आठ डोळ्यांना दोन दोन च्या क्रमाने लावायचे झाले, तरी ते सोप्पे जाणार नाही.म्हणजे, दोन दोन चे गट तुम्ही पाडाल हो पण कोणता गट कुठल्या हुद्द्याने कुठल्या क्रमांकाला ठेवायचा हा वादाचा मुद्दा होणारच.... शेवटी आपल्या देशात हुद्दा आणि क्रमांक याशिवाय कोणाचे पान तरी हलते का!!!!!



असो. तर मीच आता हुद्दा-क्रमांकाने या डोळ्यांचा हिशेब तुम्हाला सांगतो. पहिले दोन डोळे इन्स्पेक्टर गुलाबराव इनामदारांचे. आता 'गुलाबराव इनामदार' असे भरभक्कम नाव घेऊन आलेल्या माणसाला करीयर चॉईसेस जरा कमीच असतात. हे नाव घेऊन तुम्हाला काही टॅक्सी ड्रायव्हर होता येत नाही. असले नाव असलेल्या माणसाला एकतर राजकारणी व्हावे लागते नाहीतर पोलिसात जावे लागते. याच नियमाचा आधार घेऊन इनामदारसाहेब आज इन्स्पेक्टरच्या पदाला पोचले होते, ते इन्स्पेक्टर बनायला एवढेच कारण होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरेल. मागल्या इलेक्शनमध्ये मंत्रिमहोदयांच्या 'फोरीन-रिटर्न' मेव्हणीचे हरवलेले पॉमेरेनियन हवालदार इनामदाराने तीन तासात शोधून दिले होते. सुटकेचा नि:श्वास टाकून आणि भलतेच खुश होऊन मंत्रिमहोदयांनी आपल्या परीसस्पर्शाने या हवालदाररूपी लोखंडाचे थेट इन्स्पेक्टररूपी (भेसळयुक्त)सोनेच करून टाकले. अशा अचानक झालेल्या परिवर्तनाने इनामदार साहेब जे बावचळून गेले ते अजूनही तसेच बावचळल्यासारखे वागत असतात. पुढचे दोन डोळे हेड-कॉन्स्टेबल जमदाडेंचे. आयुष्यभर खात्यात काढल्यानंतर आता जमदाडेंना खरे पाहता खात्यात काही रस राहिला नव्हता पण अवघ्या सहा महिन्यावर पेन्शनची सुरूवात आल्यावर हातातली नोकरी सोडण्याइतके ते वेडे नव्हते. संपूर्ण खात्यात जमदाडे 'काका' नावाने प्रसिद्ध होते. सध्याचे कमिशनर साहेब हवालदार असल्यापासून काका त्यांच्यासोबत असल्याने काकांना खात्यात चांगलाच मान होता. त्यापुढचे दोन डोळे हवालदार नाईकचे. खात्याला चिकटताना आपल्या एका गावबंधू रिटायर्ड हवालदाराने दिलेला सल्ला नाईक प्रमाण मानत असे. "कोनत्या तरी साहेबास्नी पकडून र्‍हा  आनि त्येंचा पदर सोडू नको, म्हंजे नोकरीत प्रगती फाष्ट होते". आता 'फाष्ट प्रगती'चा हा सल्ला एखाद्या रिटायर्ड हवालदाराने का द्यावा ही चर्चेची गोष्ट होऊ शकते, पण आपण सध्या चालू गोष्टीकडे लक्ष देऊ.  अखेरचे दोन डोळे विनायक देसाईंचे....विनायक देसाई हे पात्र या घटनेत फार महत्वाचे नाही. त्याचे महत्त्व एव्हढेच की ज्या चौकटीबद्दल ही कथा आहे त्या चौकटीचा मालक म्हणजे विनायक देसाई.

आता या चौकटीची ओळख तुम्हाला करून देतो. देसाईंच्या बंगल्यातील हॉलमधे ही चौकट राहायची. प्रशस्त दिवाणखान्यामधे एकदम छतालाच ही चौकट होती आणि तिला काचेचे एक सुंदर आवरणदेखील होते. आधीच भरपूर उजेड असलेल्या आपल्या घरात एखाद्या विशिष्ट उन्हाच्या तिरिपेचं कौतुक व्हावं म्हणून श्रीमंत लोक जी बांधकामं करतात त्यातलीच ही एक चौकट! मात्र आज तीच चौकट एका मोठ्या चोरीला कारणीभूत ठरलेली होती.

तर चोरीची सुरुवात आणि पार्श्वभूमीही सांगून टाकतो. दरवर्षी दोन महिने बाहेरगावी फिरायला जाणार्‍या देसाईंकडे नेमकी याच काळात चोरी झाली होती. घरातले दागदागिने, पैसाअडका चोरीला गेला होता आणि घरात प्रवेश ती चौकट फोडून झाला होता. प्रथम ही कंप्लेंट आली तेव्हा प्राथमिक रिपोर्ट वगैरे तयार करून पोलिसांनी देसाईंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या, पण मंत्रिमहोदय निवृत्त मुख्याध्यापक देसाईंचे विद्यार्थीच निघाले आणि मग तपासाला सुरुवात करावीच लागली. आपल्या गुरुजींची केस मंत्रीजींनी आपल्या चेल्या इन्स्पेक्टरवरच सोपावली.

सर्वप्रथम हे सांगायला हवे होते की ज्या तडफदारीबद्दल इनामदारसाहेबांचे 'प्रमोशन' झाले होते, ती त्यांची नव्हतीच. 'पॉमेरेनियन' असे सांगितल्यावर प्रथम 'हे बटर कुठल्या किराणा मालाच्या दुकानात मिळते?' असा प्रश्न इनामदाराला पडला असता. वास्ताविक पाहता, मंत्रिमहोदयांचे कुत्रे बाहेर गस्तीवर बिडी फुंकत बसलेल्या इनामदार हवालदाराच्या अंगावर चालून आले आणि त्याला 'माझ्या अंगावर येतोस काय!!!! थांब तुला इंगाच दाखवतो' असे म्हणून इनामदाराने पकडले. इतके दचकून जाऊ नका. पोलिसी इंगाच तो.........तो माणसे, प्राणी, सजीव, निर्जीव अशा कोणावरही दाखवता येतो. तेव्हढ्यात मंत्रीमहोदयांनी ताबडतोब बोलावले आहे म्हणून तसेच त्या कुत्र्याला घेऊन हवालदार त्यांच्यासमोर गेले. त्याला पाहताक्षणीच (म्हणजे कुत्र्याला.......हवालदाराचे मंत्र्यांना कसले कौतुक आलेय!!!) मंत्रीमहोदयांनी अतिशय प्रेमाने बायकोला 'अहो ऐकलंत का.......सांगा तुमच्या बहिणीला..... म्हणावं आमचं गृहखातं नुसत्या बिड्या फुंकत बसत नाही' असे सांगितले आणि बक्षिस म्हणून हवालदाररुपी 'वाल्या'चा इन्स्पेक्टररूपी 'वाल्मिकी' केला. या घटनेबद्दल खरी माहिती फक्त इनामदारबरोबर बिडी ओढत बसलेल्या जमदाडेकाकांना होती. पण त्यांचा एकंदर खात्यातला 'इंटरेस्ट' इतका रसातळाला गेला होता, की त्यांना या घटनेचे आश्चर्य, संताप, मत्सर वगैरे काहीही वाटले नव्हते.

या चोरीचा तपास ही इन्स्पेक्टर इनामदारांकडे आलेली पहिली केस; त्यातसुद्धा मंत्रीमहोदयांचे थेट लक्ष म्हणजे तर चूक होता कामा नये. इनामदारसाहेबांनी तपास सुरू केला आणि तब्बल चार आठवडे 'कसून' चौकटीच्या चारही बाजूंना सापडलेल्या हाताच्या ठशांच्या आधारे देसाईंकडे काम करणार्‍या विष्णूला त्यांनी पकडले. सुमारे एकशे-दहा किलो वजन असणार्‍या विष्णुला इनामदारांनी चौकशीला घेतले.
"साहेब, मला काहीच माहीत नाही."
"मग तुझ्या हातांचे ठसे तिथे कसे सापडले?" इनामदार साहेबांनी शक्य तेव्ह्ढा कडकपणा आणत विचारले.
"साहेब, त्या चौकटीची साफसफाई मीच करतो. त्यामुळे आले असतील." विष्णूने सफाईदारपणे उत्तर दिले.
जमदाडेकाकांना जरा शंका आली. पण विष्णूला पकडायला पुरावा नाही हेही त्यांच्या लक्षात आले. जेमतेम २*२ च्या चौकटीतून विष्णू आत जाणे शक्यच नव्हते. शिवाय आतमधे कुठेही विष्णूच्या हातांचे ठसे नव्हते. त्यांनी इनामदारसाहेबांना तसे सुचवून पाहिले.
"कमाल करताय जमदाडेकाका तुम्ही, अहो त्याने चौकट फोडली असेल आणि मग आतमध्ये हातमोजे घालून चोरी केली असेल" मिशीला पीळ मारत नाईक हवालदार म्हणाला. जमदाडेकाकांनी चूक केलेली आपण पकडली याचे त्याला चांगलेच समाधान वाटले. इनामदारसाहेबांनी चेहर्‍यावर मोठ्ठे प्रश्नचिन्ह घेऊन जमदाडेंकडे पाहिले.
या लॉजिकला कमीत कमी अपमानकारक उत्तर कसे द्यावे हेच जमदाडेकाकांना समजेना.
"अरे पण चौकटीवरच ठसे सोडायची त्याला काय हौस होती का? तसे असते तर हातमोजे घालूनच त्याने चौकट फोडली असती की." वैतागून जमदाडे म्हणाले. इनामदारसाहेबांना ते पटल्यासारखे वाटले.तेव्हढ्यात त्यांना मंत्रालयातून फोन आला. सदर्‍याला फटाक्याची माळ लावल्यासारखे इनामदारसाहेब पळत पळत फोनजवळ गेले.
"गुड मॉर्निंग साहेब"........"हो साहेब"........."येतो साहेब"........"निघालोच साहेब"........"गुड डे साहेब" अशी 'साहेब-परेड' झाल्यावर खिश्यातून हातरुमाल काढत त्यांनी घाम पुसला आणि म्हणाले,"साहेबांनी बोलावलंय. जाऊन येतो'.

मंत्रालयात  मंत्रिमहोदय चांगलेच धुमसत होते. चार आठवडे होऊन गेले तरी इनामदारसाहेबांना अजून एक आरोपी सापडू नये याचे त्यांना आश्चर्य वाटत होते.
"इनामदार, तुम्ही इतके दिवस झाले ही केस हँडल करताय, तुम्हाला साधा एक आरोपी मिळू नये?"
"सॉरी साहेब"
"अहो सॉरी कसले म्हणताय मला. पुढच्या आठवड्यात त्या शाळेत विद्यार्थी मेळावा आहे. त्याचा प्रमुख पाहुणा आहे मी. तिथे हे देसाई असणारच. काय बोलू त्यांच्याशी मी? तिथे भाषणात माझी अब्रू काढतील."
"तपास चालू आहे साहेब"
मंत्री तरातरा चालत इनामदारसाहेबांसमोर जाऊन उभे राहिले.
"मला काय पत्रकार समजला का तुम्ही इनामदार? अहो परवा त्या 'लोकधारा'ने आक्खा लेख छापलाय 'गृहमंत्र्यांना स्वतःच्या शिक्षकाच्या घरी झालेल्या चोरीचा शोध कसा लागत नाही?' म्हणून!!!!! अहो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमची चेष्टा केली. म्हणाले,'आमच्या मर्जीतल्या एखाद्या हवालदाराकडे देऊ का तपास? लवकर शोधून काढतील'. काय बोलायचे आता." हाताची बोटे मोडत मंत्रिमहोदय म्हणाले.
"लवकरच शोध लागेल साहेब" इनामदारसाहेब अगदी रडकुंडीला आले होते.
"निघा तुम्ही आता" वैतागून मंत्र्यांनी इनामदारांना हाकलले.

दोन दिवसांनंतर जमदाडेकाका आपल्या नातीला घेऊन सर्कस बघायला गेले. तिथे दोर्‍या आणि मल्लखांबावर प्रात्यक्षिके करणार्‍या पोरांना काका आणि त्यांची नात तोंड वासून बघतच राहिले होते. तिथेच काकांच्या डोक्यात एक कल्पना चमकली.

दुसर्‍या दिवशी ठाण्यात गेल्या-गेल्या त्यांनी इनामदारसाहेबांना ती कल्पना सांगितली. इनामदारसाहेबांचे डोके आधीच इतके भंजाळले होते, की त्यांच्यासमोर ठेवलेले सगळेच पर्याय चोर पकडून देतील अशी त्यांची समजूत झाली होती. विष्णूच्या मुसक्या बांधून त्याला पुन्हा ठाण्यात आणले गेले. जमदाडेकाकांनी आता जरा वेगळ्या लाईनने तपास सुरू केला आणि विष्णू चोरीच्या आधी पंधरा दिवस रोज सर्कशीच्या आसपास घुटमळत होता हे त्यांना कळाले.

पोलीसी खाक्या दाखवताच विष्णू पोपटासारखा पटापट बोलू लागला. सर्कशीतल्या एका बारा वर्षाच्या मुलाबरोबर मिळून त्याने हा गुन्हा केला होता. विष्णूने त्याला ती भरभक्कम चौकट उपटून देताच हातमोजे घातलेल्या त्या पोराने अगदी सहजतेने आत घुसून चोरी केली होती. दोघांनाही कोठडीत डांबण्यात आले.

मंत्रिमहोदयांसमोर इनामदारसाहेब उभे होते. . जमदाडेकाका खोलीबाहेर दाराजवळ उभे राहून ऐकत होते.
"कसा काय पकडलात मग चोराला?"
"साहेब, दोन चोरांचे काम होते. एकाने घरफोडी केली, दुसर्‍याने चोरी." नम्रपणे इनामदारसाहेब म्हणाले.
"वा वा"
"आधीपासूनच शंका होती साहेब. पण पुराव्याशिवाय आपण काम करत नाही. आणि तुमच्याकडून आलेली केस म्हणजे रात्रंदिवस झटून काम करत होतो."
मंत्र्यांच्या चेहर्‍यावर अभिमान आणि बाहेर जमदाडेकाकांच्या चेहर्‍यावर हसू ओसंडून वाहत होते.
"तशी केस अवघड होती साहेब पण आपला आदेश आला की स्फुरणच चढले"
"छान छान. अशीच प्रगती करत रहा . आमचे लक्ष आहे तुमच्यावर" मंत्रिमहोदय उत्तरले.
आता मात्र जमदाडेकाकांना हसू आवरेना. तसाच तोंडावर हात दाबत ते पळत बाहेर आले. बाहेर नाईक उभा होता. त्याने लगेच विचारले,"काय झालं काका?"
"काही नाही, काही नाही. काढ एक बिडी"
नाईकने बिड्यांचा बंडल काकांना दिला.
"काहीही म्हणा काका, इनामदारसाहेबांचं डोकंच भारी. इतक्या 'फाश्ट' डोक्याचं काय रहस्य असेल कोणास ठाऊक!"
उत्तरादाखल जमदाडेकाकांनी त्याच्यासमोर एक बिडी धरली
"बिड्या ओढ लेका बिड्या!" आणि ते खो-खो हसू लागले.

No comments:

Post a Comment