Wednesday, June 27, 2012

बळी................

नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......



===
==
=
==
===
तशी मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. शेजारीच राहायची आमच्या. शेजार्‍यांच्या दारात त्यांनी पाळलेल्या कोंबडीच्या लहान लहान पिलांबरोबर खेळायची, त्या पिलांना दाणे भरवायची. तेव्हाच माझ्या मनात हे असले विचार येऊ लागले होते. शेजार्‍यांचा तिच्यावर कमालीचा जीव होता आणि जीव ओवाळून टाकण्यासारखीच होती ती.....जेव्हा जेव्हा मी तिला खेळवायला जवळ घ्यायचो, तेव्हा तेव्हा तिच्या वासाने, स्पर्शाने माझ्या मनात एक भूक उसळायची. अखेर याच भुकेने सद्सविवेकबुद्धीचा संपूर्ण ताबा घेतला.....

मी तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केल्याबरोबरच आमच्या घरमालकाने माझ्याकडे एका वेगळ्याच संशयाने पाहायला सुरुवात केली होती. चौदा भाडेकरू असलेल्या वाड्यात गुपित सांभाळणे हे अवघडच नाही तर अशक्य काम होते. सुरुवातीला घरमालकाने मला नजरेनेच धमकी द्यायचा प्रयत्न केला. पण एकदा डोक्यात तसली नशा चढली की माणसाला देवाचेही भय उरत नाही तिथे घरमालकाला कोण जुमानतो! माझा निशाणा पक्का होता आणि त्या दिशेने प्रयत्नही मी चालू केले होते. काहीही करून तिला उचलायचे मनात होते. तो एव्हढासा जीव मला प्रतिकार करणार नाही हे माहितच होते मला........ आणि नेमके तेव्हाच घरमालकाने घोटाळा केला.

घरमालकाने आपली शंका शेजार्‍याच्या कानावर घातली आणि तिथून माझा सगळाच डाव फसायची शंका मला आली. तिला कोणत्याही परिस्थितीत मी हातातून जाऊ देणार नव्हतो. शेजार्‍यांनी तिची जास्तच काळजी घ्यायला सुरुवात केली. आता ती मला बाहेर फारशी दिसेनासी झाली. सहकुटुंब बाहेर जातानाही शेजारी तिला कुलुपाआड बंद ठेवू लागले. माझीही अस्वस्थता वाढायला लागली. खेळण्यापासून लांब ठेवलेल्या मुलाला जसे तेच खेळणे हवे असते, तशीच मला तीच हवी होती, पण मला तिच्याशी फक्त खेळायचे नव्हते. माझी इच्छा त्याहून फार भयंकर होती. काहीही करून आता तिला मिळवायचे या निश्चयाने आता मला झपाटून टाकले होते.

आणि अखेर तो दिवस आलाच. जवळच असलेल्या किराणामालाच्या दुकानात शेजार्‍याची बायको काहीतरी आणायला गेली अन तेव्हढ्यासाठी कडीकोयंडा कशाला म्हणून तिने दरवाजा उघडाच ठेवला. मला हीच संधी होती आणि मी ती हातातून जाऊ देणार नव्हतो. डोळ्यासमोर मला आता  फक्त तीच दिसत होती. जेमतेम पंधरा मिनिटांचा वेळ होता माझ्याजवळ...........दरवाजा उघडून मी आत शिरलो. घरात चहूदिशांना माझी नजर भिरभिरू लागली. पण ती मला दिसेना. इनमिन चार खोल्यांचे घर ते! त्यात सुद्धा ती घरातच असणार याची मला खात्री होतीच. घराचे मागचे दार सताड उघडे होते. घरात एका खोलीत खाटेवर झोपलेल्या म्हातारीखेरीज कोणीही नव्हते. हळूच मी चारही खोल्या धुंडाळल्या. पण ती मला दिसेना. आता जास्तीत जास्त १० मिनिटे माझ्याकडे उरली होती.

मला प्रचंड राग येऊ लागला......स्वतःचाच...... जवळजवळ दोन आठवडे वाट पाहिल्यावर ही संधी मला मिळाली होती. मी पुन्हा डोके शक्य तेव्हढे शांत ठेवून घर शोधायला लागलो. म्हातारी अजूनही घोरत होती. अचानक मला म्हातारीच्या खाटेच्या बाजूने खडबड ऐकू आली. सर्रकन माझी मान त्या दिशेने वळली. म्हातारीची खाट अन भिंत यामधे एक माणूस झोपू शकेल एव्हढी जागा होती अन खाटेने दोन भिंतींशी त्रिकोण केला होता. काय खडबड झाली हे पाहायला म्हातारीला ओलांडून जाणे भाग होते अन त्यात म्हातारी जागी झाली तर माझी धडगत नव्हती. वेळ जात होता अन कुठल्याही क्षणी शेजार्‍याची बायको येऊ शकली असती. अखेर मी म्हातारीला ओलांडून जायचे ठरवले. काहीही झाले तरी मी ही संधी सोडणार नव्हतो.  म्हातारीच्या खाटेला ओलांडून पलीकडच्या बाजूला मी पाय टाकला. अन त्या त्रिकोणात मला ती दिसली. बारीक डोळे माझ्याकडे रोखून ती बघत होती. कदाचित आपल्या भविष्याची तिला कल्पना आलीच असावी. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आता तिला मी उचलणार इतक्यात.........

जिन्यात पावले वाजल्याचा आवाज आला अन खाटेवरच्या म्हातारीला खोकल्याची उबळ आली.

भिंतीच्या विरुद्ध दिशेला म्हातारी तोंड करून झोपली होती. उबळ आल्यासरशी तिच्या डोक्याजवळच्या एका बाटलीतून तिने कसलेसे औषध पिले अन आता म्हातारी कूस बदलून माझ्या दिशेने पाहणार हे माझ्या लक्षात आले. आता मला हवी असलेली गोष्ट माझ्या हातात होती. त्या लहानशा जीवाला आपल्याभोवती चालू असलेल्या गोंधळाची कल्पनाही नव्हती. म्हातारीने कूस बदलायला सुरूवात केली अन पुढल्या दरवाजाची कडी वाजली.

माझी गडबड उडाली. आता काय करावे हेच मला सुचेना. खाटेच्या पायाशी दोन तीन उशा पडलेल्या मला दिसल्या अन काय करावे हे न कळाल्याने मी त्यातल्या दोन उशा म्हातारीच्या तोंडावर फेकल्या. महिने-दोन महिने हात सुद्धा न लावलेल्या त्या उशा उचलताच त्यातून धुळीची एक लाट आली अन म्हातारीच्या तोंडावर त्या आदळल्यावर तर धुळीचे लोटच उठले. म्हातारीचे खोकणे नव्या जोमाने सुरू झाले. मागचा दरवाजा उघडाच होता अन पुढचा आता उघडू लागला होता. हातात तिला घट्ट पकडून मी मागच्या दरवाजाने धूम ठोकली.

परसात जाऊन मी तिला खाली ठेवली. शांतपणे अन समाधानाने तिच्याकडे पाहू लागलो. नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.........................

माझा कार्यभाग तर उरकला आता पुरावे नष्ट करण्याची गरज होती, मला घरामागची मोकळी जागा आठवली.  कुणाच्याही नकळत  एक लहानसा खड्डा खणून मी त्यात तीचे अवशेष......हो आता अवशेषच राहीले होते.......त्यात पुरून टाकले.............. 

==========================

तर बाळू खुरोंडे म्हणजे एक नंबरचा बिनडोक माणूस. येडचापाला अक्कल म्हणता काही नाही. आता आमचा भाडेकरू म्हणून तीन-साडेतीन वर्षे राहतोय पण कध्धी म्हणून शहाणासुरता वाटला नाही. बायकोमुळे संसार नीट चालू आहे म्हणायचा.

गेले तीनेक महिने मात्र त्याची लक्षणे काही नीट दिसत नव्हती. त्या गायतोंड्यांची दोन वर्षांची मुलगी वाड्यात कुठे खेळत असताना ह्याची नजर असायची. गायतोंडे प्राथमिक शाळेत शिक्षक. माणूस एकदम साधाभोळा. अशा माणसाला असल्या गोष्टी सांगणे आमचेच कर्तव्य. मी सांगितले त्यांना की या खुरोंड्याची चिन्हे काही नीट नाहीत. लक्ष ठेवा जरा! पण गायतोंडे कसला ऐकतो! नाही म्हणायला घरात पोरीला बंद ठेवायला लागला म्हणा!

पण त्या दिवशी बाहेरून आलो तर गायतोंड्यांकडे गोंधळ उडालेला...... घरी जायच्या आधी सरळ तिथे गेलो. पोरगी बेपत्ता झाली होती. दोन तास झाले घरात पोरीचा पत्ता नव्हता. दोन वर्षाची पोरगी जाऊन जाऊन अशी किती वेळ घरातून नाहीशी होणार!!!! घरात म्हातारीचा खोकायचा आवाजच घुमत होता. गायतोंडे रडायचाच बाकी होता. "पोलिसाकडे जाऊ" म्हणायला लागला. त्याला म्हटलो थांब जरा. आधी खुरोंड्याकडे जाऊ, मग पोलिसाकडे! गायतोंडेच्याच घरातला एक सागवानी दांडका घेऊन सरळ खुरोंड्याकडे गेलो.

खुरोंड्याकडे मांस-मच्छीचा वास पसरला होता. गायतोंडेला काही समजले नसले तरी मला वेगळीच शंका आली. खुरोंड्याने दार उघडले अन तसेच त्याचा कानाखाली एक आवाज काढला. खुरोंड्या तीन फूट लांब उडून मगच उभा राहिला.
"बाळ्या, कुठे आहे ह्याची पोरगी?" मी ओरडलो.
खुरोंड्या थरथरत होता. त्याला घाम फुटला होता. कसाबसा चाचरत तो म्हणाला.
"पोरगी? कस्.....कोणाची पोरगी?"
"गायतोंडेंची पोरगी!!!!!!! तूच पळवले का नाही बोल हरामखोरा!!!!" मी दुसर्‍या गालावर तडाखा हाणणार इतक्यात बाळ्याची बायको मधे आली.
"वहिनी, तुम्ही मध्ये येऊ नका. ह्या साल्याला त्या पोरीवर नजर ठेवताना मी पाहिले आहे. पोरगी बेपत्ता झालीये आज. पोलिस येतीलच पण आधी तुला आम्हीच तुडवून काढतो." मी आता दांडका उगारला.
बाळ्याच्या घशातून कसाबसा आवाज फुटला.
"अहो कसली पोरगी? मला खरंच काही माहीत नाही. अहो मी पोरगी पळवली नाही. मी तर तिच्याकडे पाहिले पण नाही."
"मग कोणाकडे पाहत असायचास रे? आणि वास कसला सुटलाय घरात?" मी पुन्हा दरडावले.

गायतोंडे मटकन खाली बसला. आता हा वास त्याच्या लक्षात आला.

"अहो............कोंबडी................"
"काय कोंबडी? कसली कोंबडी साल्या?"
" अहो गायतोंडेची कोंबडी........."
"......."

"मालक, चूक झाली हो माफ करा.  मी कोंबडी पळवली हो गायतोंडेची!!!! अहो मी असे नको करायला पाहिजे होते. माझी चूक झाली हो......" खुरोंड्या धाय मोकलून रडत होता. मी, गायतोंड्या अन खुरोंड्याची बायको एकमेकांकडे बघायला लागलो.

इतक्यात गायतोंडेची बायको पळत आली.

"मालक, सापडली  हो पोरगी! तुमच्याच घरी खेळत बसली होती. तुमची बायको आत्ता पोचवून गेली घरी."
गायतोंड्या गेल्यावर थोडंस वशाट मी घरी घेऊन आलो. बदल्यात नंतर गायतोंड्याची समजूत काढली. ते काही अवघड नव्हतं........

आजकाल वाड्यात कामं सोडून इतरत्र लक्ष द्यायचं कमी केलं आहे जरा......... मूर्खांचा बाजार उठलाय जणू आमच्या वाड्यात.....................

4 comments: