Monday, January 16, 2012

भक्ती



उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ  भक्तीचा, दूर पसरतो ||



दूर पहा तिथे, बैसे कोणीतरी
हातातील नाणी, उगीच मोजतो ||
पोटाचेच जिथे, रोजचे सायास
कैसा भक्तीभाव, तयाला सुचतो ||

उडवती नाणी, ओवाळिती नोटा
सारे त्या भगवंता, लाच दाखविती ||
येई कोणी शेट, मागाहून पुढे
देवाहून जास्ती, सलाम ठोकिती ||

हा परी इथे, खातो शिळेपाके,
देवाच्या वाटी, साधा नमस्कार  ||
भक्ती मनी दाटे, परी भूक लागे,
पोटापुढे नसतो, मनाचा विचार ||

कोणी मागी देवा, धनधान्य पुत्र
कोणी आरोग्य, आयुही मागिती  ||
सारी असली जरी, देवाचीच पोरं,
एक दुजियाचा, नाशही मागिती ||

देव येई निघुनी, याच्यापुढे उभा,
"मला लेका तुझा, नमस्कार भारी ||
येती लाखो माझ्या, सामोरी आडवे
भक्तीपरी मात्र, पैशाची मुजोरी  ||

बदलती देव, कपड्यासारखा
भावापेक्षा यांची, धनाची सलामी  ||
पैशाच्या तोडीचा, हवा आशीर्वाद
देवालाही लावी, कराया गुलामी ||

पुंडलिक तूच, दामाजीही तूच
पैशाची श्रीमंती, नाही मला प्यारी ||
जोडी दोन हात, घेई माझे नाम
तृप्ती माझ्या मनी, तयाचीच सारी" ||


देव जाई निघुनी, मंदिरी कल्लोळ
सारेची  निष्फळ, प्रयत्न यांचे ||
दोषारोप चालू, पोलीसा सांगिती,
पूरची लोटिती, हरेक उपायांचे ||

अखेरीस कोणी, आणिती पाषाण
शेंदूर फासून, "देव" सारी  म्हणे ||
पुनश्च चालू, दगडाचा जयघोष,
देव परी दूर, पाहतो विषण्णे ||

6 comments:

  1. Replies
    1. Thanks Vaibhav...... Tuze pan sher asech FB var vagire publish kar yaar....... :)

      Delete
  2. NiShiDe - I aint expert in commenting on kavita, pan bhari aahe as vichar....kahi goshti farach patlya ani avadlya.....like the one where u said ki kon kon dusryacha naashach magta vagere...awesome! Evdhya varshanni ka update marlas? Evdhe divas kahich ka nahi lihilas? Koni nahi tar atleast tujhya writing cha ek fan tar nakki aahe!

    ReplyDelete
    Replies
    1. Abhishek,
      manapasun dhanyavaad......
      itakya kaalane update kaaran madhyantari kahi suchatach navte changale aani phaltu lihinyapeksha n lihilele bare......
      :)

      Delete